जळगाव- अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातून गेल्याने हवालदिल झालेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा नवे संकट उभे राहिले आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 5 ते 6 हजार हेक्टरवरील केळी बागांना फटका बसला आहे. थंडीचे प्रमाण वाढल्यावर अजून जास्त क्षेत्राला फटका बसण्याची भीती आहे.
जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून ओळखला जातो. सद्यास्थितीत जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यातील सुमारे 48 हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड झालेली आहे. त्यापैकी 70 टक्के क्षेत्रावरील केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून 5 ते 6 हजार हेक्टरवरील केळीचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता केळीवर आलेल्या करप्याच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जळगाव, यावल आणि रावेर तालुक्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. यापुढच्या काळात थंडीचे प्रमाण अधिक वाढेल. त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव विस्तारण्याची भीती आहे. ही शक्यता गृहीत धरून कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकात्मिक रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने मार्गदर्शन करायला हवे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.