जळगाव- पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या बहुळा मध्यम प्रकल्पात गेल्या वर्षी १०० टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे हा प्रकल्प ९० टक्के भरला असून परिसरातील शेतकऱ्यांनी यामुळे आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान प्रशासनाने या प्रकल्पातील २ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू केला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र, प्रकल्प भरल्याने पाचोरा शहरासह तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
तालुक्यासाठी संजीवनी असलेल्या बहुळा प्रकल्पावर पाचोरा तालुक्यातील अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. पाचोरा शहरासह वेरुळी खुर्द, वेरुळी बुद्रुक, वडगाव टेक, वडगाव असेरी, गोराडखेडा खुर्द, गोराडखेडा बुद्रुक, आरवे, लोहारी खुर्द, लोहारी बुद्रुक, वरखेडी, भोकरी, कुऱ्हाड, सांगवी, मोहाडी, साजगाव बिल्दी, खेडगाव (नंदी), पहान, हडसन, वडगाव गुजर, दुसखेडा अशा एकूण २२ ग्रामपंचायतींच्या गावांसह पाचोरा शहरासाठी या मध्यम प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो.