जळगाव- शेतकर्यांना योग्य भावात खते व बियाणे उपलब्ध करून द्यावेत, तातडीने पीक कर्ज वाटप करावे, बोगस बियाणे विकणार्यांवर कारवाई करावी, तसेच तिन्ही कृषी कायदे तातडीने रद्द करावेत, या मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आज जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्री करत आंदोलन करण्यात आले आहे.
जळगावात बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन राज्यव्यापी आंदोलनाची हाक
कोरोनामुळे शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा शेतकरी वर्गाला देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या विविध समस्या व अडचणी आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज (शनिवारी) राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच अनुषंगाने जळगावात देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.
घोषणाबाजी आणि भाजीपाला विक्री करत नोंदवला निषेध
या आंदोलनाप्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्री करत निषेध नोंदवला आहे. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मागण्यांसाठी झाले आंदोलन
1) खते, बियाणे जुन्या दरापेक्षाही 50 टक्के कमी दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत.
2) नाशवंत भाजीपाला, फळभाज्या, फळे आणि शेतीशी निगडीत आवश्यक वस्तूची दुकाने दिवसभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी.
3) तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश बँकांना द्यावेत.
4) बोगस बियाणे व भेसळयुक्त रासायनिक खते विक्री थांबवावी, कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने खते, बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी
5) केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करण्यात यावेत.
हेही वाचा -राज्यात इंधनदराचा भडका; अनेक जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार