महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात प्रवासी महिलेचे दागिने लंपास; पोलिसांकडून रिक्षाचालकास अटक - जळगावात रिक्षा चालकास अटक

रिक्षामधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील दागिने भामट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून आरोपीला अटक केली आहे. तसेच त्या रिक्षात असलेल्या सहप्रवाशांचा शोध सुरू केला आहे

जळगावात प्रवासी महिलेचे दागिने लंपास;
जळगावात प्रवासी महिलेचे दागिने लंपास;

By

Published : Nov 13, 2020, 6:14 PM IST

जळगाव- बोहरा गल्ली ते राधाकृष्ण मंगल कार्यालय दरम्यान रिक्षामधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील दागिने भामट्यांनी लंपास केले. गुरुवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. या प्रकरणी रिक्षाचालकास शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. सैय्यद हुसेन सैय्यद हसन (२८, रा. पिंप्राळा हुडको) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

मनिषा ज्ञानेश्वर शिंदे (४८, रा. मेहरूण) या भाजीपाला खरेदी करण्यासाठी व दुरुस्तीसाठी टाकलेले सोन्याचे दागिने घेण्यासाठी गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्या सुभाष चौकात आल्या होत्या. भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांनी दुरुस्तीसाठी टाकलेले दागिने दुकानातून घेतले. त्यानंतर घरी परतण्यासाठी बिलाल चौकातून रिक्षात बसल्या. आधीच रिक्षामध्ये दोन महिला प्रवासी होत्या. त्यातील एक महिला खाली उतरली व तिने मनिषा यांना मधल्या बाजुस बसण्यास सांगितले. दोन्ही महिलांच्या मध्ये मनीषा बसल्या. त्यानंतर बोहरा गल्लीतून रिक्षा मेहरूणच्या दिशेने निघाली.

मनिषा यांना रस्त्यातच सोडले-

राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ चालकाने रिक्षा थांबविली. नंतर मनिषा शिंदे यांना खाली उतरविले आणि मी या दोन महिलांना सोडून येतो. तुम्ही इथेच थांबा असे सांगून चालकाने भाडे न घेता रिक्षा घेवून तेथून पोबारा केला. बराच वेळ होवूनही रिक्षा येत नसल्यामुळे अखेर मनिषा यांनी दुसऱ्या रिक्षाने घर गाठले. मनिषा शिंदे या घरी पोहोचल्यावर त्यांनी त्यांची पर्स तपासली असता, त्यातील २८ हजार ८०० रुपये किंमतीचे सोन्याचे काप व ४३ हजार २०० रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले झुमके चोरीस गेल्याचे समजले. रिक्षात बसलेले असताना पर्समधून ते चोरी झाल्याची खात्री त्यांना झाली. अखेर मनिषा शिंदे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीमुळे रिक्षाचालकाचा शोध

शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांना रिक्षाचालक व त्यातील प्रवासी महिलांवर संशय बळावला. रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये रिक्षाचा क्रमांक मिळून आला. त्यानुसार रिक्षाचालक हुसेन याला आज शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. तर त्या दोन्ही महिलांचा शोध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details