महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 3, 2019, 11:49 AM IST

ETV Bharat / state

औरंगाबाद-जळगाव महामार्ग आठ दिवसात दुरुस्त करा; गडकरींच्या ट्वीटद्वारे अभियंत्यांना सूचना

गडकरींनी ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना औरंगाबाद-जळगाव महामार्ग आठ दिवसात दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या.

गडकरींच्या ट्वीटद्वारे अभियंत्यांना सूचना

जळगाव - औरंगाबाद ते जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे गेल्या वर्षभरापासून भिजत घोंगडे पडले आहे. पावसामुळे या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकभावना तीव्र झाल्या आहेत. या महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याची दखल केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. त्यांनी शनिवारी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना औरंगाबाद-जळगाव महामार्ग आठ दिवसात दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा -सत्ता स्थापनेचा तिढा 9 तारखेपर्यंत सुटेल - गिरीश महाजन

शनिवारी या मार्गावरील जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळील पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सतत चालू-बंद होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. औरंगाबाद ते जळगाव अवघ्या तीन तासाच्या प्रवासासाठी तब्बल सहा ते सात तास मोजावे लागत असून वाहनांचे अपघात देखील वाढले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरून खासगी प्रवासी वाहतूक तसेच एसटी महामंडळाच्या बसेस देखील बंद करण्यात आल्या आहेत. या परिस्थितीमुळे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या मार्गावर होणारे अपघात तसेच नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे व्हिडिओ तसेच फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्याची दखल अखेर नितीन गडकरी यांनी घेतली असून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काय म्हटले आहे गडकरींनी ट्विटमध्ये?

ट्विट

औरंगाबाद-सिल्लोड-जळगाव रस्त्याची अत्यंत वाईट स्थिती झाल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. याबाबत मी महाराष्ट्र राज्याच्या महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. त्यात तत्काळ याची दखल घेऊन आठ दिवसात हा मार्ग दुरुस्त करून चांगल्या स्थितीत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details