जळगाव- महापालिका मालकीच्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील मुदत संपलेले गाळे सील करण्यासाठी गेलेल्या महापालिका उपायुक्तांना गाळेधारकांनी दुकानात डांबण्याचा प्रयत्न केला. काल (सोमवार) दुपारी हा खळबळजनक प्रकार घडला. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याने आठ गाळेधारकांवर गुन्हा दाखल झाला. दुसरीकडे, गाळेधारकांनी या कारवाईचा निषेध करत मार्केट बंद करुन शहर पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
जळगाव महापालिका मालकीच्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील भाडे कराराची मुदत संपलेल्या साडेनऊशे गाळेधारकांना ८१ क च्या नोटिसा बजावून ११ ऑक्टोबरपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली होती. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने दोन दिवसाची मुदतवाढ देवूनही अनेक गाळेधारकांनी थकबाकी भरली नाही. अशा थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई करण्यासाठी उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे हे अतिक्रमण व किरकोळ वसुली विभागाच्या पथकासह फुले मार्केटमधे गेले होते. यावेळी फत्तेचंद जसुमल सिंधी यांचे ११५, ११६ व ११७ असे तीन गाळे सुरुवातीला सील करण्यात आले. सील व पंचनामा पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने आनंद रोषनलाल नाथाणी यांच्या दोन गाळ्यांपैकी एक गाळा सील केला. दुसरा गाळा सील करत असताना उपायुक्त व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक दुकानात असतानाच अचानक सुमारे २५ ते ३० व्यापारी दुकानात घुसले. त्यांनी उपायुक्तांसह पथकातील कर्मचाऱ्यांना घेराव घातला. गुट्टे त्यांना बाहेर निघण्याची विनंती करीत असताना काही जणांनी एक ते दोन वेळा लाईट बंद करीत उपायुक्त गुट्टे व पथकातील कर्मचाऱ्यांना दुकानातून बाहेर जाण्यास प्रतिबंध केला. तसेच गुट्टे यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यावेळी उपायुक्तांसह कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत दुकानातून पाय काढता घेत थेट शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
हेही वाचा - रॅगिंगमुळे भंगले 'त्याचे' डॉक्टर होण्याचे स्वप्न!