महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंगावर पेट्रोल ओतून तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; जळगावातील घटना - जळगाव क्राईम बातम्या

नवाजच्या खिशातून १ हजार २०० रुपये काढून घेतले. नवाजने विरोध, प्रतिकार करण्यास सुरुवात करताच नशेत असलेल्या एकाने थेट एका बाटलीतील पेट्रोल नवाजच्या अंगावर फेकले. तर दुसऱ्याने काडीपेटी घेत पेटवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून भेदरलेल्या नवाजने जिवाच्या आकांताने घटनास्थळावरून पळ काढला.

जळगाव
जळगाव

By

Published : Sep 26, 2020, 8:26 PM IST

जळगाव - शहरातील महात्मा गांधी मार्केटमध्ये शनिवारी दुपारी साडेचार वाजता एक धक्कादायक घटना घडली. गांजाची नशा करत असलेल्या पाच-सहा तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाला लुटत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तरुणाने घटनास्थळावरून पळ काढत स्वत:चा जीव वाचवला. गांधी मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाज शेख अल्लाऊद्दीन (वय १७, रा. शनिपेठ) असे या घटनेत जीव वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. नवाज याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा लहान भाऊ मानसिकरित्या कमजोर आहे. तो घरातून बाहेर पडल्यानंतर कुठेही निघून जातो. शनिवारी अशाच प्रकारे त्याचा लहान भाऊ घराबाहेर पडला होता. बराच वेळ होऊनही तो घरी परत न आल्याने नवाज हा एका मित्रासह शहरात त्याचा शोध घेत होता. शोध घेत असताना दुपारी ४.३० वाजता नवाज व त्याचा मित्र गांधी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. तेथे निर्मनुष्य जागी पाच-सहा तरुण गांजाची नशा करीत होते. नवाजला पाहून त्या तरुणांनी जवळ बोलावले. यानंतर सर्वांनी नवाजला घेरुन दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर एकाने नवाजच्या खिशातून १ हजार २०० रुपये काढून घेतले. नवाजने विरोध, प्रतिकार करण्यास सुरुवात करताच नशेत असलेल्या एकाने थेट एका बाटलीतील पेट्रोल नवाजच्या अंगावर फेकले. तर दुसऱ्याने काडीपेटी घेत पेटवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून भेदरलेल्या नवाजने जिवाच्या आकांताने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी त्याची चप्पल देखील तेथेच राहून गेली. नशेत असलेल्या तरुणांनी काही अंतर त्याचा पाठलाग केला. परंतु, नशेत असल्यामुळे त्यांना धड पळताही येत नव्हते. अखेर त्यांनी नवाजचा पाठलाग करायचे सोडून तेथून पळ काढला.

हेही वाचा -कृषी विधेयकाविरोधात आंदोलन, कोरोना नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल

या घटनेमुळे नवाज प्रचंड भेदरला होता. तक्रार करण्यासाठी तशाच अवस्थेत त्याने थेट पोलीस उपअधीक्षक कार्यालय गाठले. तेथून त्याला शहर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. ही घटना माहिती झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे एक पथक गांधी मार्केटमध्ये गेले होते. यावेळी घटनास्थळावर नवाजची चप्पल, पेट्रोलची बाटली, गांजा पिण्याचे साहित्य मिळून आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details