जळगाव- जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव दारुगोळा कारखान्यात दोन सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला झाला. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी केला? हे स्पष्ट झालेले नाही. पहाटेची वेळ साधून मद्य, गुटखा व तंबाखूची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेले अज्ञात व्यक्ती हल्लेखोर असावेत, असा अंदाज सुरक्षारक्षकांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे दारुगोळा निर्मिती कारखान्यातील सुरक्षेचा मुद्दा तर ऐरणीवर आलाच आहे, शिवाय कारखान्यात अवैधरित्या मद्य, गुटखा व तंबाखूची तस्करी होते का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
कारखान्यात सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला हेही वाचा-मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर
मनोज अहिरराव आणि शांताराम जोहरे अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांची नावे आहेत. त्यांच्यावर दारुगोळा निर्मिती कारखान्यातील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सुरक्षारक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दोघेही दारुगोळा निर्मिती कारखान्यातील हॉस्पिटल पॉईंट जवळील मुख्य प्रवेशद्वारावर ड्युटीला होते. पहाटे चारच्या सुमारास एक काळ्या रंगाची ओमनी व्हॅन कारखान्यात प्रवेश करत होती. सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा रक्षक अहिरराव आणि जोहरे यांनी व्हॅन अडवली. व्हॅनमध्ये 4 ते 5 जण होते. त्यांना कुठे जात आहात, अशी विचारणा केली असता त्यांनी आम्हाला साहित्य सोडायला जायचे आहे, असे सांगितले.
सुरक्षारक्षकांनी व्हॅनमध्ये काय साहित्य आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला असता काही कळायच्या आतच व्हॅनमधील चौघांनी सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत हॉकी स्टिकने मारहाण करायला सुरुवात केली. मारहाणीत सुरक्षारक्षक जमिनीवर पडताच हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर जखमी झालेल्या दोघांना त्यांच्या सहकाऱ्यांनी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या घटनेप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान, या घटनेमुळे दारुगोळा निर्मिती कारखान्यातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी देखील याठिकाणी सुरक्षारक्षकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या सुरक्षारक्षकांनी व्हॅनमध्ये मद्याच्या बाटल्या, गुटखा व तंबाखूचे खोके असल्याचे पाहिले आहे. त्यामुळे कारखान्यात नशेच्या वस्तुंची तस्करी होते का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
घटनेमुळे निर्माण झाले अनेक प्रश्न..
या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुरक्षारक्षकांवर हल्ला करणारे अज्ञात लोक हे चोरीच्या उद्देशाने कारखान्यात प्रवेश करत होते का? ते दरोडेखोर होते का? असेही प्रश्न आहेत. त्यांच्याकडे हॉकीस्टिक, मिरचीपूड असे साहित्य असल्याने ते दरोडेखोर असावेत, असाही अंदाज आहे.