जळगाव - जिल्हा उपकारागृहात एका कैद्यावर जुन्या वादातून तीन कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना काल(15 जानेवारी) सकाळच्या सुमारास घडली. शुभम देशमुख उर्फ दाऊद (वय २०, रा. अमळनेर), असे या घटनेत जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
शुभम देशमुख हा प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात उपकारागृहात बंदी आहे. काल सकाळी त्याच्यावर राकेश वसंत चव्हाण, त्याचा भाऊ राजू वसंत चव्हाण (दोघे रा. अमळनेर) आणि राहुल पंढरीनाथ पाटील यांनी जुन्या वादातून प्राणघातक हल्ला केला. या घटनेत शुभमवर पत्र्याने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर हल्ला करणारे तिघे देखील बंदी म्हणून उपकारागृहात आहेत. सकाळी साडेसात वाजता शुभम हा कारागृहाच्या आतील आवारात उभा होता. यावेळी राकेश, राजू तसेच राहुल हे त्याच्याजवळ आले. यांनी त्याच्याशी जुन्या विषयावरून वाद घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक चकमकीनंतर त्यांच्यातील एकाने शुभम याच्या चेहऱ्यावर हातातील धारदार पत्र्याने वार केला. त्यामुळे शुभम जखमी झाला.