जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञातांनी केला हल्ला केला. त्या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथून विवाहाच्या हळदीच्या कार्यक्रमावरून मुक्ताईनगरकडे येत असताना यांच्या वाहनावर हल्ला झाला. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या हल्ल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी पळ काढला. हल्ल्यात रोहिणी खडसे थोडक्यात बचावल्या असुन हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
स्थानिक शिवसेना आमदाराचा आरोप -
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) व त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर ( Rohini Khadse) यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil Allege on Eknath Khadse ) यांनी केला होता. तसेच मागील दोन वर्षांपासून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी नाव न घेता केला. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली. तर चंद्रकांत पाटलांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे. 'मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत. आमच्या तक्रारीनंतर आता पोलीस कारवाई सुरू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. यातूनच ते निरर्थक आरोप करत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.