जळगाव- कारागृहात असलेल्या नातेवाईकांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांवर तलवरीने प्राणघातक हल्ला झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी 2 वाजता जिल्हा उपहारागृहाबाहेर घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सनी जाधव व रणजीत इंगळे अशी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.
सोमवारी दुपारी सनी व रणजीत हे दोघे कारागृहाच्या बाहेर आले होते. त्याचवेळी एका चारचाकीतून 4 तरुण देखील तेथे आले. कारागृहाच्या गेटजवळ सर्वजण उभे असताना डबा देण्याच्या कारणावरुन त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यानंतर चारचाकीतून आलेल्या तरुणांनी थेट सनी, रणजीत यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्ला केल्यांनतर काही सेकंदातच चारही हल्लेखोर पळून गेले. यानंतर सनी व रणजीत या दोघांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.