जळगाव -जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी स्टेट बँकेचे एटीएम मशीन रोकडसह चोरून नेले. बुधवारी पहाटे ही घटना उजेडात आली. या मशिनमध्ये १७ लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती समोर आली आहे.
चाळीसगाव शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या समोर स्टेट बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम मशीनच चोरट्यांनी मंगळवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान चोरून नेले. हे एटीएम भर रस्त्यावर अत्यंत वर्दळीच्या भागात आहे. चोरट्यांनी काचेचा दरवाजा फोडून मशीन लांबविले. मंगळवारी दुपारी या एटीएममध्ये १७ लाखांची रोकड भरण्यात आली होती.
- रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला प्रकार-
ही चोरीची घटना रात्री गस्त घालणाऱ्या चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाच्या लक्षात आली. त्यांनी गाळे मालकाला झोपतून उठवून पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनाही ही घटना कळवली. घटनास्थळी ठाकुरवाड यांच्यासह एपीआय विशाल टकले, निसार सय्यद यांनी धाव घेत पंचनामा व तपासाची प्रकिया सुरू केली.
चाळीसगाव शहरातील भरवस्तीतील एटीएम मशीन पळविल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चाेरट्यांनी जवळपास १७ लाखांची रोकड व एटीम मशीन लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, एटीएम मशीन रोकडसह चोरून नेणारे चोरटे हे परप्रांतीय असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चोरटे हे टोळीने वाहनातून आले असावेत, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्वान पथकासह दाखल झाले होते.