जळगाव - खान्देशच्या ग्रामीण बोलीभाषेतील ओव्यांनी जीवनाचा सार अवघ्या जगाला सांगणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या जळगाव तालुक्यातील असोदा गावात सध्या भीषण पाणीटंचाई भासत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ उदभवल्याने संतप्त झालेल्या असोदा येथील ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या समोर उपोषण करत गावाची पाणीसमस्या निकाली काढण्याची मागणी केली. येत्या 8 दिवसात पाणीप्रश्न सुटला नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या असोदा गावाला गेल्या २५ ते ३० वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई भासत आहे. सुमारे ३५ हजार लोकसंख्येच्या असलेल्या असोदा गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणत्याही स्वरूपाचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आज परिस्थिती बिकट झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांना वणवण भटकंती करावी लागत आहे. गुरांच्या पाण्याचा प्रश्नही कठीण आहे. असोदा गावापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर तापी नदीवर शेळगाव मध्यम प्रकल्प आहे. परंतु, हा प्रकल्प अपूर्ण असल्याने असोदावासीयांची अवस्था 'धरण उशाला, कोरड घशाला' अशी झाली आहे. सध्या गावात २५ ते ३० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, तो देखील अत्यंत दुषित असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढी भीषण परिस्थिती असताना जिल्हा परिषद प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे.