जळगाव - राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा रुग्णालयात आत्तापर्यंत कोरोना संशयित असलेल्या 394 रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 297 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 6 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित 89 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
जळगाव जिल्हा रुग्णालयातील ओपीडी सेंटरमध्ये आजअखेर एकूण 4 हजार 733 संशयित रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शक्य त्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. परंतु, गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्याच्या शेजारील धुळे, नंदुरबार, बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावला. या संक्रमित जिल्ह्यातील नागरिक जळगावात दाखल झाल्याने इकडेही संसर्ग वाढत आहे. धुळे जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या अमळनेरात मागील आठवडाभरात 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील 2 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.