महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग.स. सोसायटीच्या सत्कार समारंभात वाद; सहकार-लोकसहकार गटातील मतभेद चव्हाट्यावर - jalgaon news

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीतील सहकार व लोकसहकार गटातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

जळगाव

By

Published : Jun 23, 2019, 11:44 PM IST

Updated : Jun 24, 2019, 10:52 AM IST

जळगाव - जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीतील सहकार व लोकसहकार गटातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वादाचे पडसाद आज (रविवारी) सोसायटीतर्फे आयोजित सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभात उमटले. ज्येष्ठ सभासदांचा सत्कार आणि कार्यक्रमाला झालेला दोन तास उशीर हे वादाचे निमित्त ठरले.

जिल्ह्यात सुमारे 40 हजार सरकारी नोकरदार सभासद आणि 900 कोटी रुपयांचे खेळते भागभांडवल असलेल्या ग.स. सोसायटीतील बेहिशेबी 50 लाख रुपयांच्या व्यवहारप्रकरणी माजी अध्यक्षासह विभागीय अधिकाऱ्याच्या अटकेची चर्चा थांबत नाही, तोच आता सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत पाल्ल्यांच्या सत्कार समारंभात सहकार व लोकसहकार गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्यामुळे ग.स. सोसायटी परत चर्चेत आली आहे. ग.स. सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. आयोजक असलेल्या सत्ताधारी लोकसहकार गटाकडून समारंभासाठी सकाळी 10 वाजेची वेळ देण्यात आली होती. मात्र, 12 वाजूनही कार्यक्रम सुरू झाला नाही. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ सभासदांचा सत्कार टाळण्यात आला. त्यामुळे सहकार गटातील सदस्यांनी हरकत घेत गोंधळ घातला.

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेचा मुद्दा देखील काहींनी उपस्थित केला. सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ हा संस्थेचा कार्यक्रम असताना लोकसहकार गटाने केवळ आपल्या गटाच्या नावाने निमंत्रण पत्रिका छापल्याने सहकार गटातील सदस्यांनी नाराजी व्यक्त करत कार्यक्रम सुरू असताना गोंधळ घातला. लोकसहकार गटाने जाणीवपूर्वक ज्येष्ठ सभासदांचा सत्कार टाळला, असा आरोप करत सहकार गटातील सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत सभागृहातून काढता पाय घेतला.

जळगाव

मंत्री, खासदारांसमोर गोंधळ

या कार्यक्रमाला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यासमोरच सोसायटीच्या दोन्ही गटाच्या सदस्यांनी गोंधळ घालत अतिशय बेशिस्त वर्तन केले. दरम्यान, कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी गोंधळाचे चित्रीकरण करायला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांशी देखील काही सदस्यांनी असभ्य वर्तन करत हुज्जत घातली.

Last Updated : Jun 24, 2019, 10:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details