जळगाव - शहरातील अर्चित राहुल पाटील या विद्यार्थ्याची 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारा'साठी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते अर्चितला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या प्रातिनिधिक स्वरुपात हा पुरस्कार देण्यात आला असून, लवकरच त्याला पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. दरम्यान, अर्चितने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराला गवसणी घातल्याने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
हेही वाचा -भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात अदखलपात्र तक्रारीची नोंद
अर्चित पाटील हा जळगावातील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. राहुल पाटील व डॉ. अर्चना पाटील यांचा मुलगा आहे. तो शहरातील काशिनाथ पलोड इंग्लिश मीडियम स्कुलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. अर्चितने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काय आहे अर्चितचे संशोधन?
अर्चितने अल्ट्रा लो कॉस्ट सिलिकॉन डिव्हाईस म्हणजेच 'पोस्ट पार्टम हॅमरेज कप' (पीपीएच कप) हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून प्रसुतीनंतर मातेच्या शरिरातून होणारा रक्तस्त्राव अगदी बरोबर मोजता येतो. या माध्यमातून प्रसूत झालेल्या मातेच्या शरिरातून अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत आहे किंवा नाही, याचा अंदाज डॉक्टरांना येतो. जर, प्रसूत मातेच्या शरिरातून अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर 'गोल्डन अवर'मध्ये योग्य उपचार करून त्या मातेचा जीव वाचवता येऊ शकतो. अशा प्रकारच्या उपकरणाचा अद्याप शोध लागलेला नव्हता. अर्चितने ते उपकरण शोधून काढले आणि त्याच उपकरणाची केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने दखल घेत 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कारा'साठी अर्चितची निवड केली.
अनेक स्पर्धांमध्ये झाली आहे उपकरणाची निवड
अर्चितने बनवलेल्या उपकरणाची निवड अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये झाली आहे. त्यात इन्स्पायर मानक अवॉर्ड 2020, एमएस सिग्नेचर अवॉर्ड 2020, सीएसआयआर इनोव्हेशन अवॉर्ड फॉर स्कुल चिल्ड्रेन 2020, आयआरआयएस नॅशनल सायन्स फेअर, अमेरिकन सोसायटी फॉर इंजिनिअर्स अशा प्रकारच्या स्पर्धांचा समावेश आहे. सॅनिटरी वेस्टच्या पर्यावरणपूरक विघटनाच्या प्रेझेन्टेशनसाठी अर्चितला यापूर्वी 2017-18 मध्ये डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. या शिवाय अर्चितने अनेक जिल्हा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.
दोन दिवसापूर्वी मिळाली पुरस्काराची माहिती