जळगाव -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा भाग म्हणून खासगी रुग्णालयांवर दर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी खासगी रुग्णालयांना शुल्क आकारणीच्या कमाल दर मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आलेली आहे. खासगी वाहने, रुग्णवाहिका अधिग्रहीत करुन शासन स्तरावर त्यांचे कमाल दर निश्चित केलेले आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करुन देण्याबात सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून विहीत दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्यात येत असल्याबाबत शासन स्तरावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. उच्च न्यायालयात देखील जनहित याचिका याचिकाकर्त्याकडून दाखल झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या पथकाने शासन निर्णयात नमूद सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याची खातरजमा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिसूचित दर रुग्णालयातील दर्शनी भागावर रुग्णांना व नातेवाईकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. या पथकाने खासगी रुग्णालयाकडून रुग्णांना देण्यात येणारी देयके अंतिम करण्यापूर्वी तपासणी करण्यासाठी या कार्यालयाच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आलेल्या लेखापरिक्षण पथकाच्या सहकार्याने आकारले जाणारे दर खासगी रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर विहीत आहे किंवा नाही याची तपासणी करावी, असेही या निर्देशात म्हटले आहे.