महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भुसावळातील 31 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण; जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 382 - जळगाव कोरोना अपडेट

जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या 500 पेक्षा जास्त तपासणी अहवालांपैकी आज 251 अहवाल प्राप्त झाले. यात 250 अहवाल निगेटिव्ह आले असून, केवळ भुसावळ येथील 31 वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

CoronaVirus : Another corona positive patient in Jalgaon total number of patients 382
भुसावळातील 31 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण; जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 382

By

Published : May 23, 2020, 8:35 PM IST

जळगाव - सातत्याने कोरोना संसर्ग वाढत असलेल्या जळगाव जिल्हावासीयांना आज (शनिवार) आठवडाभराने काहीसा दिलासा मिळाला. जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या 500 पेक्षा जास्त तपासणी अहवालांपैकी आज 251 अहवाल प्राप्त झाले. यात 250 अहवाल निगेटिव्ह आले असून, केवळ भुसावळ येथील 31 वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 382 इतकी झाली आहे. दरम्यान, रावेर व भडगाव येथील प्रत्येकी एक बाधित रुग्ण कोरोनामुळे दगावल्याने मृतांची संख्या 48 झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 382 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात अमळनेर येथील 106 तर त्यापाठोपाठ जळगाव शहरात सर्वाधिक 97 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील 573 तपासणी अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी भुसावळ येथील गंगाराम प्लाॅट, प्रोफेसर काॅलनी, शनिमंदिर, रामदासवाडी व इतर ठिकाणच्या 251 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 250 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर एका 30 वर्षीय डाॅक्टरचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 382 झाली आहे.

जिल्ह्यातील अमळनेर शहरात कोरोनाचा उद्रेक आता थांबला आहे. अमळनेर पाठोपाठ जळगाव आणि भडगाव शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. दोन्ही ठिकाणी सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. जळगाव शहरातील बाधित रुग्णसंख्या शतकाच्या उंबरठ्यावर आहे. भडगावातही एकापाठोपाठ एक असे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने भीतीचे वातावरण आहे.

मूळ भडगाव शहरातील रहिवासी असलेल्या महसूल विभागातील एका अधिकाऱ्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्या अधिकाऱ्याने तरीही नियम धाब्यावर बसवून वडिलांचे अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्काराला गर्दी जमल्याने भडगाव शहरात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे बोलले जात आहे. याविषयी स्थानिक तसेच जिल्हा प्रशासन मात्र, बोलायला तयार नाही. यापूर्वी अमळनेर शहरातही असाच प्रकार घडला आहे. तरीही प्रशासन गांभीर्याने पावले टाकत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

रावेर शहरातील भगवती नगरातील एका 60 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा शनिवारी जळगाव येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेला वृद्ध रावेर शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. या वृद्धाचा कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी सुरुवातीला भुसावळला रवाना करण्यात आले होते. तेथून त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना आज दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

हेही वाचा -श्रमीक रेल्वेने मध्यप्रदेशात जाणाऱ्या मजूर महिलेला प्रवासात सुरू झाल्या प्रसवकळा, अन्... .

हेही वाचा -जळगावात कोरोनाबाधित मृतांची विल्हेवाट लावताना अक्षम्य निष्काळजीपणा

ABOUT THE AUTHOR

...view details