जळगाव - अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने सत्यमेव जयते राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. ग्रामस्थांनी स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाची उत्तम कामे केली आहेत. त्याचे फलित म्हणून पहिल्याच पावसाळ्यात गावाच्या शेतशिवारात कोट्यवधी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. वर्षानुवर्षे कोरडठाक असलेल्या विहिरी, कूपनलिका, हातपंप जिवंत झाले आहेत.
आनोरेवासीयांची दुष्काळावर मात; वॉटर कप स्पर्धेतही मारली बाजी - राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धा
अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने सत्यमेव जयते राज्यस्तरीय वॉटरकप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. ग्रामस्थांनी स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाची उत्तम कामे केली आहेत. त्याचे फलित म्हणून पहिल्याच पावसाळ्यात गावाच्या शेतशिवारात कोट्यवधी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. वर्षानुवर्षे कोरडठाक असलेल्या विहिरी, कूपनलिका, हातपंप जिवंत झाले आहेत.
![आनोरेवासीयांची दुष्काळावर मात; वॉटर कप स्पर्धेतही मारली बाजी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4172240-thumbnail-3x2-anore.jpg)
आनोरे हे सुमारे ४०० ते ४५० लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. गावाचे सर्व अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीसाठी तर सोडाच पिण्याच्या पाण्यासाठीदेखील टँकरवर अवलंबून रहावे लागत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग घेतला आणि श्रमदानातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली. ग्रामस्थांचे काम पाहून प्रभावित झालेल्या मंत्री चंद्रकांत पाटलांनी शासनाच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता.
ग्रामस्थांच्या प्रयत्नांना निसर्गानेही भरभरून साथ दिल्याने गावात जलक्रांती घडली आहे. तीन महिन्यांपूर्वी दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या आनोरे गावाने आपली नवी ओळख निर्माण केली आहे. हा सकारात्मक बदल पाहण्यासाठी राज्यभरातील लोक गावाला भेट देत आहेत.