जळगाव -अंगणवाड्यांचे समायोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो अंगणवाडी सेविका बेरोजगार होणार असल्याने सरकारने अंगणवाडी केंद्राचे समायोजन रद्द करावे. या प्रमुख मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता.
राज्यातील सुमारे 27 हजार अंगणवाड्यांचे समायोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील 2 हजार 336 अंगणवाड्यांचा समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारच्या या अन्यायकारक निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील साडेचार हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. ही वेळ येऊ नये म्हणून सरकारने अंगणवाड्यांच्या समायोजनाचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मोर्चेकरी अंगणवाडी सेविकांनी केली.