महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाघूर धरणातील जलसाठा वाढला; जळगावची पाणीकपात होणार रद्द !

जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणाचा जलसाठा वाढला असून शहरातील पाणीकपात ३ दिवसांवरून आता २ दिवसांवर येण्याची शक्यता आहे. परंतू पालिका प्रशासन मात्र अद्यापही यावर सकारात्मक नाही.

By

Published : Jul 31, 2019, 5:58 PM IST


जळगाव -जिल्ह्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या जलसाठ्यातही १० ते १२ टक्के वाढ झाली आहे. शहराचा पाणीपुरवठा ३ ऐवजी २ दिवसाआड करण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनी प्रशासनाला दिला आहे. मात्र, वाघूर धरणामध्ये अजूनही पुरेसा जलसाठा नसल्याचे सांगत प्रशासन 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे.

मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यानंतर यावर्षी पाऊस देखील दीड महिना उशिराने दाखल झाला. त्यामुळे जळगावकरांवर जलसंकट निर्माण झाले होते. २ महिन्यांपूर्वी वाघूर धरणाचा जलसाठा ८ टक्क्यांवर आल्याने महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा एप्रिल महिन्यापासून ३ दिवसाआड केला होता. जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनीही विरोध दर्शविला नव्हता. मात्र, आता जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. विशेषतः वाघूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या जामनेर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा २० ते २२ टक्क्यांवर गेला आहे. पाऊस सुरूच असल्याने जलसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणीपुरवठा ३ ऐवजी २ दिवसाआड करावा, अशी मागणी केली जात आहे.

जळगावची पाणीकपात रद्द होणार!
शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी वाघूर धरणातून १०० एमएलडी पाण्याची उचल करावी लागते. एप्रिल महिन्याआधी जेव्हा पाणीपुरवठा २ दिवसाआड होत होता तेव्हाही धरणातून १०० एमएलडी पाण्याची उचल सुरू होती. पुढे महापालिका प्रशासनाने एप्रिलमध्ये पाणी बचतीसाठी पाणी कपातीचा निर्णय घेतला. त्यानंतर पाणीपुरवठा ३ दिवसाआड होऊ लागला. तरीही धरणातून १०० एमएलडी पाण्याची उचल सुरू आहे. जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पाण्याची नासाडी सुरू असल्याने पाणी कपातीचा निर्णय घेऊनही फायदा झाला नाही. आता गळत्या थांबल्या आहेत. त्याचप्रमाणे धरणात २० ते २२ टक्के जलसाठा आहे. ही बदललेली परिस्थिती लक्षात घेता पाणीकपातीतून जळगावकरांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत देखील शिवसेनेच्या नगरसेवकांनी २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आमदार सुरेश भोळे व स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र, वाघूर धरणामध्ये अजून पुरेसा जलसाठा नसल्याचे सांगत प्रशासन याबाबत सकारात्मक नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details