जळगाव- प्रेमसंबंधाच्या संशयावरून शहरातील एका १८ वर्षीय तरुणाची गुजरात राज्यातील सुरत येथे हत्या करण्यात आली. काही तरुणांनी चाकूने भोसकून या तरुणाचा खून केला. रितेश सोमनाथ शिंपी (व.१८, रा. खडके चाळ, शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुरतच्या दिंडोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत रितेश शिंपी हा शहरातील शिवाजीनगर भागात राहतो. तो कानबाई मातेच्या उत्सवासाठी शनिवारी रात्री सुरत येथे त्याच्या मावशीकडे गेला होता. सुरतच्या नवागाम दिंडोली परिसरात त्याची मावशी राहते. याच परिसरातील एका तरुणीसोबत रितेशचे प्रेमसंबंध असल्याचा तरुणीच्या नातेवाईकांना संशय झाला होता. त्यानंतर ते रितेश सोबत सतत वाद घालत होते. यापूर्वी अनेकदा त्यांच्यात वाद झाला होते. तरुणीशी संबंध ठेऊ नको, सुरतमध्ये येऊ नको, अन्यथा जीवे ठार मारू, अशा धमक्या त्यांनी रितेशला दिल्या होत्या.