जळगाव -चांद्रयान-२ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो सज्ज झाली आहे. चांद्रयान-२ मोहीम यशस्वी झाली तर चंद्राविषयीची अधिक रहस्य तर उलगडतीलच पण अंतराळावर अधिसत्ता गाजवणारा देश म्हणून भारताची नवी ओळख देखील निर्माण होईल. असा विश्वास जळगावातील खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी व्यक्त केला.
इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ई टीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी जोशी यांनी चांद्रयान-२ मोहिमेविषयी सखोल माहिती दिली. ते म्हणाले की चांद्रयान-२ मोहीम म्हणजे भारतासाठी अभिमानास्पद असा क्षण आहे. सन २००८ मध्ये पाठवलेल्या चांद्रयान-१ मध्ये चंद्राच्या कक्षेत फिरणारे ऑरबिट लावण्यात आले होते. पण, चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन संशोधन करणारे रोव्हर त्यावेळी त्यात नव्हते. यावेळी मात्र, या यानाचे रोव्हर चंद्रावर उतरणार आहे. आता चांद्रयान-२ मोहिमेतील रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. तेव्हा चंद्राची आणखी रहस्ये उलगडता येणार आहेत. चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाल्यावर त्याचे ऑर्बिटर, लँडरपासून वेगळे होणार आहे. त्यानंतर लँडर १५ मिनिटांमध्ये चंद्राच्या जमिनीवर उतरेल आणि रोव्हर वेगळा होईल. ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणे, कॅमेरे आणि सेंसर्स असणार आहेत. अशाचप्रकारे रोव्हर देखील अत्याधुनिक उपकरणांनी युक्त असेल. ऑर्बिटर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभूमीवरील खनिजे आणि इतर संबंधिची माहिती पाठवण्याचे काम करतील, असे जोशी यांनी सांगितले.