जळगाव -जिल्ह्यातील भुसावळ शहरातील न्यू एरिया वॉर्डातील एका 53 वर्षीय अत्यवस्थ महिलेस सव्वातास प्रतीक्षा करूनही रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला चक्क हातगाडीवर झोपवून रुग्णालयामध्ये नेले. हा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडला. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
धक्कादायक : अत्यवस्थ महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने हातगाडीवरून नेले रुग्णालयात! - जळगाव लेटेस्ट न्यूज
तीन दिवसांपूर्वीच वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडलेली असताना, भुसावळातही असाच काहीसा प्रकार घडल्याने आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभार समोर आला आहे.
![धक्कादायक : अत्यवस्थ महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने हातगाडीवरून नेले रुग्णालयात! jalgaon latest news jalgaon health system news जळगाव लेटेस्ट न्यूज जळगाव आरोग्य यंत्रणा न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8684348-127-8684348-1599268188658.jpg)
भुसावळ शहरातील न्यू एरिया वॉर्डात राहणाऱ्या कमलाबाई मनोहर मालवे (वय 53) यांना बुधवारी रात्री अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. रक्तदाब वाढल्याने त्यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात संपर्क केला. मात्र, तब्बल अर्धा तास प्रयत्न करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यानंतर खासगी रुग्णवाहिकेच्या चालकांसोबत संपर्क करण्यात आला. पण कमलाबाई यांची प्रकृती गंभीर होत असताना रुग्णवाहिका त्याठिकाणी पोहोचली नाही. शेवटी कमलाबाई यांच्या नातेवाईकांनी त्यांना हातगाडीवर गादी टाकून त्यावर झोपवले आणि घराशेजारी असलेल्या एका रुग्णालयात नेले. पण त्याठिकाणी डॉक्टर नसल्याने कमलाबाई यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला.
रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने शेवटी त्यांना दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या मानवतकर रुग्णालयामध्ये हातगाडीवरूनच नेण्यात आले. त्याठिकाणी वेळीच उपचार मिळाल्याने कमलाबाई यांचे प्राण वाचले. दरम्यान, या घटनेमुळे पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा प्रत्यय आला. या विषयासंदर्भात पालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पालिकेला कुठल्याही रुग्णाच्या नातेवाईकांनी संपर्क केल्यावर तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची ही मदत होते, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली.