महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : 42 लाख लोकसंख्येसाठी अवघ्या 300 रुग्णवाहिका; कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांची लूट - jalgaon corona cases

जळगाव जिल्ह्यातील 42 लाख लोकांसाठी शासकीय आणि खासगी मिळून अवघ्या 300 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. दुसरीकडे सतत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची रुग्णवाहिका चालकांकडून लूट सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Ambulance driver demands Lots of money from COVID-19 patients for journey to hospital in jalgaon
जळगाव : 42 लाख लोकसंख्येसाठी अवघ्या 300 रुग्णवाहिका; कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांची लूट

By

Published : Sep 16, 2020, 11:02 AM IST

जळगाव -जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत असून, आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत चालला आहे. रुग्णवाहिका हा देखील आरोग्य यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु, जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील 42 लाख लोकसंख्येसाठी शासकीय आणि खासगी मिळून अवघ्या 300 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. सतत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची अक्षरशः लूट सुरू असून, या प्रकारावर शासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याची स्थिती आहे.

42 लाख लोकसंख्येसाठी अवघ्या 300 रुग्णवाहिका...

राज्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्याप्रमाणात पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. रुग्णवाहिका हा त्यातलाच एक घटक आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना राज्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. पुण्यात तर एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला वेळेवर कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने जळगाव जिल्ह्यातील स्थितीचा आढावा जाणून घेतला. त्यात जळगावातील परिस्थिती देखील धक्कादायक असल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांसाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून या माध्यमातून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत. राज्य शासनाने या मुद्द्यावर काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अशी आहे जळगावातील स्थिती -
सन 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 42 लाख 30 हजार आहे. या जनगणनेनंतर 9 वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे ही संख्या आता लाखोंनी वाढली असेल. परंतु, एवढ्या मोठ्या लाखोंच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णवाहिका मात्र, शेकडोंच्या संख्येतच उपलब्ध आहेत. त्यातही जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.

जळगाव जिल्ह्यातील रुग्णवाहिकेच्या स्थितीसंदर्भात माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 15 तालुक्यांचा विचार केला तर 1 जिल्हा रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालये, 18 ग्रामीण रुग्णालये आणि 77 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्वांसाठी जवळपास दीडशे शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्यात 34 रुग्णवाहिका या 108 सुविधेंतर्गत कार्यरत आहेत. 9 रुग्णवाहिका या कार्डियाक प्रकारातील आहेत. उर्वरित रुग्णवाहिका साधारण तसेच ऑक्सिजनची सुविधा असलेल्या आहेत. जीर्ण झाल्यामुळे निर्लेखित होण्याच्या मार्गावर असलेल्या काही रुग्णवाहिका शववाहिका म्हणून वापरात आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासकीय रुग्णवाहिका सेवेवर प्रचंड ताण पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लगेचच जिल्ह्यातील खासगी सेवाभावी संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांच्या रुग्णवाहिका मानधन तत्त्वावर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनाला 58 रुग्णवाहिकांची सेवा मिळत आहे. खासगी रुग्णवाहिकांना आरटीओ विभागाच्या नियमानुसार मानधन दिले जात आहे. कोरोनाच्या रुग्णांची रुग्णवाहिकेअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा शक्य त्या उपाययोजना करत आहे. कोरोनाच्या रुग्णांव्यतिरिक्त प्रसूतीसाठी महिलांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो, असेही डॉ. चव्हाण यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

अधिग्रहित केलेल्या खासगी रुग्णवाहिकांची बिले अडकली -
जिल्ह्यातील खासगी रुग्णवाहिकांच्या स्थितीबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना कवी कासार यांनी सांगितले की, जिल्ह्यात दीडशेहून अधिक खासगी रुग्णवाहिका आहेत. त्यात 20 ते 25 रुग्णवाहिका या सेवाभावी संस्था व संघटनांच्या, 120 ते 125 रुग्णवाहिका खासगी तसेच 20 ते 30 रुग्णवाहिका या खासगी रुग्णालयांच्या आहेत. खासगी रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तसेच डॉक्टर्स उपलब्ध असतात. अनेक खासगी रुग्णालयात कार्डियाक प्रकारातील रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील 58 खासगी रुग्णवाहिका शासनाने कोरोनामुळे मानधन तत्त्वावर अधिग्रहित केलेल्या आहेत. जून महिन्यात ही कार्यवाही करण्यात आली. परंतु, जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णवाहिकांची जुलैपासूनची बिले रखडली आहेत. वेळेवर बिले सादर करून देखील शासनाकडून परतावा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत खासगी रुग्णवाहिका कशा धावतील? हा प्रश्न आहे. चालकांचा पगार, रुग्णवाहिकांच्या मेंटेनन्सचा खर्च करणे अशक्य झाले आहे. शासनाने आम्हाला ओमिनीसाठी 1 हजार रुपये प्रतिदिवस मानधन तसेच 10 रुपये प्रतिकिलोमीटर, सुमोसाठी 1 हजार 200 रुपये प्रतिदिवस मानधन तसेच 12 रुपये प्रतिकिलोमीटर, टेम्पो ट्रॅव्हलरसाठी 1 हजार 400 रुपये प्रतिदिवस मानधन तसेच 15 रुपये प्रतिकिलोमीटर आणि कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी 2 हजार रुपये प्रतिदिवस मानधन तसेच 20 रुपये प्रतिकिलोमीटर असा परतावा ठरवून दिला आहे. परंतु, रुग्णवाहिका अधिग्रहित केल्यानंतर अनेक तालुक्यात आतापर्यंत बिले अदा केलेली नाहीत, ही रखडलेली बिले त्वरित मिळावीत, अशी मागणी कवी कासार यांनी केली.

जिल्हा रुग्णालयात 3 रुग्णवाहिका कार्यरत -
कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकांची कमतरता नको, म्हणून जिल्हा रुग्णालयात सुरुवातीला काही खासगी रुग्णवाहिकांची सेवा घेण्यात आली होती. मात्र, बससेवा व दळणवळाची यंत्रणा सुरू झाल्यानंतर यातील तीन रुग्णवाहिकांची सेवा बंद करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात दोनपैकी एक रुग्णवाहिका बंद असून एकातही पूर्ण व्यवस्था नसल्याने ती वापरात नाही. त्यामुळे रुग्णवाहिका कमतरतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खबरदारी म्हणून जी. एम. फाउंडेशन आणि केशवस्मृती प्रतिष्ठानची प्रत्येकी एक रुग्णवाहिका अधिग्रहित केली आहे. जिल्हा रुग्णालयातून रुग्णांना घरी सोडण्यासाठी किंवा रुग्णालयातून रुग्ण बाहेर हलविण्यासाठी, बाहेरील रुग्णांच्या काही तपासण्या करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता असते. शिवाय रुग्णांना आधी रुग्णवाहिकांमधूनच घरी सोडले जात होते. सध्या जिल्हा रुग्णालयात तीन रुग्णवाहिका उपयोगात आहे. या तिन्ही रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था आहे. मात्र, अगदी दूर केवळ एकच रुग्ण न्यायचा असल्यास अडचणी निर्माण होतात. रुग्णवाहिका अडकून पडते. त्यामुळे दुसऱ्या रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही.

एका रुग्णासाठी दूर रुग्णवाहिका पाठविल्यानंतर जिल्हा रुग्णालयात काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पर्याय नसतो. अखेर नातेवाईकांनाच खासगी वाहनाची व्यवस्था करावी. रुग्णवाहिकेच्या अडचणीबद्दल विचारणा केली असता, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयावर सध्या प्रचंड ताण आहे. आम्ही शक्यतो जिल्हा रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रुग्ण स्थलांतरित करत नाही. अपवादात्मक परिस्थितीत आम्ही पोर्टेबल व्हेंटिलेटरच्या मदतीने रुग्णवाहिकेतून रुग्णाला स्थलांतरित करतो. आमच्याकडे जिल्हाभरातून रुग्ण येत आहेत. अशा वेळी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णवाहिकेची मदत घेतली जाते. आता कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. एकाच वेळी शेकडो रुग्णांना डिस्चार्ज मिळतो. सर्वांना रुग्णवाहिकेतून घरी सोडणे शक्य नाही. शिवाय आता बस सेवा सुरू झाल्याने नातेवाईक तशी व्यवस्था करतात, असेही डॉ. रामानंद म्हणाले.

रुग्णांच्या नातेवाईकांची लूट -
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरू आहे. रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत. एक रुग्णवाहिका दिवसभरात साधारणपणे तीन ते चार रुग्‍णांची ने-आण करते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णवाहिकांना प्रचंड मागणी असल्याने रुग्णवाहिका चालक हजारो रुपये मागत आहेत. असा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. या परिस्थितीवर शासनाचे नियंत्रण असावे, अशी मागणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details