जळगाव- जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. दोन ते तीन दिवसांपूर्वी 'निसर्ग' चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जिल्ह्यात सर्वदूर काहीअंशी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. सद्यस्थितीत पूर्वहंगामी कापूस लागवडीला शेतकरी अधिक प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी होत असून कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. त्यादृष्टीने शेतकरी शेती मशागतीची कामे पूर्ण करतात. यंदा मात्र, दोन ते चार जूनदरम्यान 'निसर्ग' चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली असून बियाणे, खते खरेदी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी बियाणे, खतांचा तुटवडा न होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खतांचा पुरवठा प्राप्त करून घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. यामुळे यंदा 25 लाख बीटी बियाण्यांच्या पाकिटांची मागणी करण्यात आली होती. पैकी 24 लाख 57 हजार बीटी कापूस बियाण्यांची पाकिटे उपलब्ध झाली आहेत. इतर बियाणे 44 हजार 770 क्विंटल उपलब्ध झाली आहेत. तसेच कृषी आयुक्तालयाकडे विविध प्रकारच्या खतांची मागणी तीन लाख 30 हजार मेट्रिक टन एवढी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार मागणी एवढा खतांचा साठा मंजूर झाला आहे. त्यात युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आदी खतांचा समावेश आहे. यंदा 95 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात 5 टक्के वाढ अपेक्षित धरली आहे. खरिपासाठी यंदा 7 लाख 75 हजार 550 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. जिल्ह्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र 8 लाख 10 हजार 507 हेक्टर एवढे आहे. दरवर्षी, सरासरी 7 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत असते.
कापूस बियाण्याला सर्वाधिक मागणी -
जळगाव जिल्ह्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे असते. त्याखालोखाल क्षेत्र हे तृण आणि कडधान्याचे असते. पूर्वहंगामी आणि हंगामी कापसाच्या लागवडीसाठी शेतकरी तयारीत आहेत. यामुळे कापसाच्या बियाण्याला बाजारात मोठी मागणी आहे. बागायती आणि कोरडवाहू लागवडीसाठी बीटी तसेच नॉन बीटी कापूस बियाण्यांची पाकिटे खरेदी केली जात. मका, ज्वारी, बाजरी तसेच सोयाबीनच्या बियाण्याची खरेदी देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती कृषी केंद्र चालकांनी दिली.