जळगाव -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ही निवडणूक चारही पक्षांच्या सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढच्या एक-दोन बैठकांमध्ये जागा वाटपाचा तिढाही सुटेल, असा विश्वास नेत्यांनी वर्तवला. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य असलेली कोअर कमिटी गठीत झाली आहे. या बैठकीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन हे एकत्र आले होते.
अशी आहे 8 सदस्यीय कोअर कमिटी -
पहिल्याच बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांचे 8 सदस्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिटीत शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, भाजपकडून माजीमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजीमंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर आणि काँग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी व ॲड. संदीप पाटील यांचा समावेश आहे.
खडसे-महाजन बसले शेजारी-शेजारी -
या बैठकीसाठी माजीमंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे एकत्र येतात की नाही? याबाबत दिवसभर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सायंकाळी या बैठकीला हे दोन्ही नेते एकत्र आले. हे दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसले. मात्र, त्यांच्यात संवाद झाला नाही. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील या नेत्यांनी एकमेकांची नावे घेणे टाळले.