जळगाव - कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयांतर्गत येणारे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी आपला एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार आहेत, अशी घोषणा आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात केली.
जळगावात असताना रविवारी गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, राज्य सरकार घेत असलेली दक्षता, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे नियोजन यासारख्या विषयांवर माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. या संकटाला सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. हा लढा घरात बसूनच द्यावा लागणार आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयांतर्गत येणारे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. मी देखील माझा मंत्री म्हणून मिळणारा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.