जळगाव - विदर्भ आणि मध्यप्रदेशात पावसाचा जोर कायम असल्याने तापी आणि पूर्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडण्यात आले. तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या रावेर तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तापी, पूर्णा नद्यांना पूर; जळगावातील हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले - बऱ्हाणपूर मध्यप्रदेश
गेल्या ३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तापी आणि पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहेत. पूरस्थिती लक्षात घेता हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडले आहेत.
गेल्या ३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तापी आणि पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहेत. पूरस्थिती लक्षात घेता हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडले आहेत. सद्यस्थितीत धरणाची पाणी पातळी २१०.९०० मीटर आहे. धरणातून ६ हजार १९८ क्यूमेक्स म्हणजेच २ लाख ३० हजार क्यूसेक इतक्या प्रचंड वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे तापी नदीच्या पाण्याची पातळी तब्बल ५ मीटरने वाढल्याची माहिती तेथील प्रशासनाने दिली आहे. पावसाचा जोर ओसरला नसल्याने रात्रीच्या सुमारास जळगाव जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. रावेरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सायंकाळी तापी नदीच्या पुरक्षेत्रात येणाऱ्या रावेर तालुक्यातील खिरवड, नेहेते, ऐनपूर, निंबोल, विटवा, निंभोरा सिम, चोरवड तसेच अजनाड गावांना भेटी दिल्या. तसेच ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या.