रावेर (जळगाव) - तालुक्यातील सावदा येथील हॉटेल हिना पॅलेस बिअर बार व परमिट रूमच्या दारू चोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दारूची चोरी झालीच नसून, हॉटेलच्या मॅनेजरनेच काही वेटरांना हाताशी धरून लॉकडाऊनमध्ये लाखो रुपयांच्या विदेशी दारुची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात फिर्यादी हाच आरोपी निघाला असून पोलिसांनी त्याच्यासह 7 जणांना अटक केली आहे.
हॉटेल व्यवस्थापक कृष्णा सुधाकर कोष्टी याच्यासह वेटर पुरुषोत्तम शिवाजी देवकर, योगीराज लक्ष्मण भंगाळे, गोविंदा घनश्याम भंगाळे, तुषार वसंत पाटील, मयूर हेमचंद्र बराटे, शेख जाबीर शेख खलील यांना पोलिसांनी अटक केली आहे.
हॉटेल व्यवस्थापक कृष्णा कोष्टी याने 29 एप्रिल रोजी रात्री हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी 4 लाख 67 हजार रुपयांची विदेशी दारू तसेच बिअरचा साठा चोरून नेल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. सुरुवातीपासून पोलिसांना या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय होता. म्हणून हॉटेल व्यवस्थापक कृष्णा कोष्टी यासह वेटरची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत लॉकडाऊनमध्ये लाखो रुपयांच्या विदेशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचे त्यांनी कबूल केले.
...म्हणून केला चोरीचा बनाव
लॉकडाऊनमध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील अनेक वाईनशॉप आणि बिअर बारची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चौकशी सुरू आहे. याच प्रकारामुळे कृष्णा कोष्टी आणि त्याचे सहकारी धास्तावले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी केले तर बिंग फुटेल, अशी त्यांना भीती होती म्हणून त्यांनी हॉटेलमध्ये चोरी झाल्याचा बनाव केला.
तिप्पटीने विकत होते दारु
लॉकडाऊनमध्ये दारु विक्रीला बंदी आहे. अशा परिस्थितीत आरोपींनी दारुची चढ्या दराने विक्री करत लाखो रुपये कमावले आहेत. पावणे पाच लाख रुपयांची दारू जास्तीच्या दरात विक्री करून त्यांनी तिप्पट नफा कमावला आहे, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हेही वाचा -मालेगावला कोरोना बंदोबस्तासाठी गेलेले ३ पोलीस कर्मचारी निलंबित; गैरहजेरी भोवली