जळगाव -कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम न देताच केवळ ५० टक्के रक्कम दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा बँकेला आपल्या एनपीएकडे लक्ष न देता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने रक्कम पाठविली आहे, त्या शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम देण्याचा सूचना केल्या. तसेच ही रक्कम देवू शकत नसाल तर त्याबाबत लेखी द्यावे, अशाही सूचना भुसे यांनी दिल्या आहेत.
बँकांनी 'एनपीए'कडे लक्ष न देता शेतकऱ्यांना पैसे द्यावेत; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या सूचना - कृषीमंत्री दादा भुसे जळगाव बैठक
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्याचा खरीप हंगामाचा आढावा घेतला.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्याचा खरीप हंगामाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, खरीप हंगामाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा उपनिबंधक (सहकार) मेघराज राठोड यांच्यासह महसूल, पुरवठा, सहकार, कृषी, मार्केटिंग तसेच बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोनामुळे दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असला तरी राज्य शासनाने खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व तयारी केली असल्याची माहिती भुसे यांनी दिली. कृषी विभागाकडे त्यांच्या मागणीपेक्षाही जास्त खते तसेच बियाणांचा पुरवठा केला असल्याने शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी खते तसेच प्रमाणित बियाणांची कमतरता भासणार नाही. राज्याला एकूण १६ लाख क्विंटल बियाणांची गरज असते. सद्यस्थितीत कृषी विभागाकडे १७ लाख क्विंटल बियाणांची उपलब्धता असल्याचे भुसे म्हणाले. कोणत्याही खते आणि बियाणे विक्रेते दुकानदारांनी खतांचा किंवा बियांणांचा तुटवडा आहे, असे भासवून त्यात काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना कृषीमंत्री भुसे यांनी या बैठकीत दिल्या.
५० हजार मेट्रीक टन युरीया बफर स्टॉक तयार-
बियाणांसह ५० हजार मेट्रीक टन युरीयाचा बफर स्टॉक देखील जमा करण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी आवश्यक पिकांनाच युरिया द्यावा, तसेच सोयाबीनसाठी शेतकऱ्यांनी घरगुती बियाणांचा वापर करावा, असे आवाहन दादा भुसे यांनी केले.
केळी महामंडळाची स्थापना करा-
जिल्ह्याचे मुख्य पीक हे केळी असून, केळी पिकासाठी केळी महामंडळाची निर्मिती व्हावी, लिंबू प्रक्रिया केंद्र आणि संशोधन केंद्राची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. लॉकडाऊन संपल्यानंतर केळी विषयातील अभ्यासक, केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत बैठक घेवून कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे आश्वासन भुसे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खते आणि बियाणे तसेच 'शेतकरी ते थेट ग्राहक' या तत्त्वानुसार हापूस आंबा, तांदुळाचे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचा, या मोहिमेचा प्रातिनिधीक स्वरुपात शुभारंभ पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषीमंत्री दादा भुसे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.