जळगाव - ठेवींची रक्कम परत करा, या मागणीसाठी जळगावमधील ठेवीदारांनी सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी कार्यालयाच्या फलकावर बेशरमाचे झाड लावून निषेध केला. ठेवी परत मिळाल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेत १११ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात म्हणून ठेवीदारांचा लढा सुरू आहे. मात्र, त्याकडे सहकार विभागासह लेखापरीक्षक खात्याचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना सहकार विभागासह लेखापरीक्षक विभागाने गेल्या १२ वर्षांपासून झुलवत ठेवले आहे, असा आरोप करत ठेवीदारांनी आंदोलनावेळी संताप व्यक्त केला.
ठेवीदारांनी काही दिवसांपूर्वी ठेवींची रक्कम परत देण्याची मागणी करत आंदोलन केले होते. त्यावेळी ठेवीदारांना त्यांच्या ठेवींच्या रकमेचे धनादेश घेण्यासाठी नंतर यावे, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु ठेवीदारांना कोणताही धनादेश मिळाला नाही. ठेवीदारांना उपनिबंधक कार्यालयाकडून फिरवाफिरवीची उत्तरे दिली गेली. अधिकारी ठेवीदारांना भेटीची वेळ देऊन भेटत नाही, असा आरोप ठेवीदारांनी केला आहे.
या होत्या आंदोलकांच्या मागण्या
जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांच्या ठेवींच्या रकमा त्वरित परत कराव्यात, भुसावळ येथील सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या संचालकांनी सुमारे ११० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याने त्यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी करण्यात यावी, ठेवीदारांचा पैसा हडप करणाऱ्या पतसंस्थेच्या संचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.