जळगाव - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) केला आहे. सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यासाठी आज (मंगळवारी) भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.
भाजप आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. त्यात महाराष्ट्रातील जनतेने युतीला कौल दिला. मात्र, त्यानंतर सरकार स्थापन करताना शिवसेना जनादेशाचा अपमान करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली. या कृतीचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच सरकारच्या कार्यपद्धतीला विरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.