महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात प्रतिबंधित 'एचटीबीटी' वाणाची लागवड करत शेतकरी संघटनेचे सरकारविरोधात आंदोलन - ऑस्ट्रेलिया

पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे सरकारने कापसाच्या जनुकीय सुधारित असलेल्या एचटीबीटी वाणावर बंदी घातली आहे. या वाणाची निर्मिती, विक्री तसेच लागवड करणाऱ्याला एक लाख रुपये दंड तसेच पाच वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. एचटीबीटीऐवजी बीटी वाणाला सरकारने प्रोत्साहन दिले आहे. मात्र, बीटी वाणाला खत, फवारणीची औषधी मोठ्या प्रमाणावर लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ होत आहे.

प्रतिबंधित HTBT कपाशी लागवड आंदोलन

By

Published : Jun 23, 2019, 4:43 PM IST

जळगाव- महागडी खते, बियाणे तसेच मजुरीमुळे उत्पादन खर्च हाताबाहेर जात आहे. त्यामुळे शेतीचे गणित अवघड होऊन बसले आहे. यातून शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हे टाळण्यासाठी जनुकीय सुधारित वाणांना सरकारने चालना दिली पाहिजे, या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील मानमोडी गावात कापसाच्या 'एचटीबीटी' या प्रतिबंधित वाणाची लागवड करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन आज (रविवार) शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले.

जळगावात प्रतिबंधित 'एचटीबीटी' वाणाची लागवड करत शेतकरी संघटनेचे सरकारविरोधात आंदोलन

पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे सरकारने कापसाच्या जनुकीय सुधारित असलेल्या एचटीबीटी वाणावर बंदी घातली आहे. या वाणाची निर्मिती, विक्री तसेच लागवड करणाऱ्याला एक लाख रुपये दंड तसेच पाच वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. एचटीबीटीऐवजी बीटी वाणाला सरकारने प्रोत्साहन दिले आहे. मात्र, बीटी वाणाला खत, फवारणीची औषधी मोठ्या प्रमाणावर लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ होत आहे. उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात हाती येणारे उत्पन्न याचा ताळमेळ न जमणे हे शेतकरी आत्महत्या वाढण्याचे प्रमुख कारण आहे. शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर शेतकर्‍यांना बाजारपेठ स्वातंत्र्य आणि जनुकीय सुधारित वाणांना सरकारने चालना दिली पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनप्रसंगी केली. जनुकीय सुधारित वाण या कसोटीवर अगदी तंतोतंत खरं उतरतं. मात्र असे असताना सरकारने जनुकीय सुधारित वाणांवर बंदी घातली आहे.

पेस्टिसाईड्स कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी तसेच काही पर्यावरणवाद्यांची मर्जी राखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना नेहमी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लढत आली आहे. म्हणूनच सरकारने एचटीबीटी वाणावर बंदी घातली असली तरी आम्ही याचाच वापर करु. सुरुवातीला आम्ही चोरून-लपून या वाणाची लागवड करत होतो. मात्र, आता या वाणाची लागवड खुलेआम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल. प्रसंगी कारावास भोगायची आमची तयारी आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनात महिला शेतकऱ्यांची देखील लक्षणीय उपस्थिती होती.

अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, इस्त्रायल यासारख्या प्रगत देशांनी जनुकीय सुधारित वाणांचा स्वीकार केला आहे. त्यामुळे हे देश कृषी क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र, भारतात जनुकीय सुधारित वाणांवर बंदी असल्याने शेतकरी इच्छा असूनही स्वतःची प्रगती करू शकत नाही, हे वास्तव आहे. जगभरात जनुकीय सुधारित वाणांचा स्वीकार करण्यात आला आहे. जगातील प्रगत देशांमधील शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन केले आहे. हे वाण मानवी आरोग्यासाठी अपायकारक नसल्याचे देखील संशोधनातून समोर आले आहे.

मात्र, असे असताना भारतात जनुकीय सुधारित वाणासंदर्भात अनेक गैरसमज आहेत. हे वाण स्वीकारले तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. म्हणून या वाणावरील बंदी उठवून ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details