जळगाव -भारतीच जनता पक्षाचे माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील कथित प्रवेशाबाबत बुधवारी मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतरही सस्पेन्स कायम आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत खडसेंच्या प्रवेशाबाबत चाचपणी झाल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी बैठकीत खडसेंबाबत संमिश्र मत दिल्याचे सांगितले जात आहे. खडसेंनी मात्र, 'याबाबत मला काहीही माहिती नाही. ज्यांची बैठक होती त्यांनाच विचारा?' अशा शब्दात या राजकीय चर्चेचे खंडन केले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. मंत्रीमंडळातून राजीनामा दिल्यापासून ते पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी नाकारल्यावर व नंतरही त्यांच्या अन्य पक्षातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. अलीकडेच शिवसेना नेते तथा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, अब्दुल सत्तार यांनी त्यांना सेनेची ऑफर दिली. तर राष्ट्रवादीतही खडसेंचे स्वागत करुन, अशी भूमिका नेत्यांनी घेतली. त्यामुळे खडसेंविषयी खूप चर्चा सुरू आहेत.