जळगाव -भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काल रात्री घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयातील फायर ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याठिकाणी फायर ऑडिटची प्रक्रिया लालफितीत अडकली असल्याचे समोर आले आहे. महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने यासंदर्भात अग्निशमन विभागाला पत्र देण्यात आले होते. परंतु, त्यावर पुढे कार्यवाही झालेली नाही. अशा परिस्थितीत रुग्णालयात काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
'ईटीव्ही भारत'ने रुग्णालयाची पडताळणी -
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या एनआयसीयू विभागात काल रात्री घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू विभागात काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, संपूर्ण रुग्णालयाच्या फायर ऑडिटची स्थिती काय आहे. याची 'ईटीव्ही भारत'ने पडताळणी केली. त्यात फायर ऑडिटच्या संदर्भात रुग्णालय प्रशासन फारसे गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे.
फायर ऑडिटसाठी मागच्या महिन्यात झाला पत्रव्यवहार -
या विषयासंदर्भात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, जिल्हा रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी सर्व फायर इस्टिंग्यूशर बदलून घेण्यात आले होते. सद्यस्थितीत ते भरलेले आहेत. त्यानंतर मागील महिन्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी फायर ऑडिटबाबत अग्निशमन विभागाला पत्र दिले होते. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचा दावा डॉ. रामानंद यांनी केला. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनदेखील फायर ऑडिटसाठी फॉलोअप का घेतला नाही, याबाबत ते स्पष्ट माहिती देऊ शकले नाही.