जळगाव - पोलीस एन्काऊंटरमध्ये एखाद्या गुन्हेगाराचा खात्मा होणे, यात काहीही वाईट नाही. कुविख्यात गुन्हेगाराचा खात्मा होणे ही गोष्ट स्वागतार्हच आहे. परंतु, गुंड विकास दुबे याच्या एन्काऊंटरबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. सर्वांच्या मनातील शंकांचे निरसन होण्यासाठी या प्रकरणाची लवकरात लवकर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असे मत राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
आठ पोलिसांच्या हत्या प्रकरणातील कुविख्यात गुंड विकास दुबे याच्या एन्काऊंटरच्या घटनेच्या निमित्ताने उज्ज्वल निकम 'ई-टीव्ही भारत'शी बोलत होते. यावेळी निकम यांनी पोलीस एन्काऊंटर, न्यायालयीन प्रक्रिया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून आपली मते मांडली.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची ईटीव्ही भारतसोबत विशेष मुलाखत... उज्ज्वल निकम पुढे बोलताना म्हणाले की, कुविख्यात गुन्हेगाराचा खात्मा होणे ही निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु, त्याचा खात्मा कोणत्या पद्धतीने होतो, याला देखील फार महत्त्व आहे. कारण कायद्याने चाललेले राज्य, असा आपला देश आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पोलीस एन्काऊंटरमध्ये एखाद्या गुन्हेगाराचा खात्मा होणे, हे काही वाईट नाही. परंतु, गुन्हेगार शरण आल्यानंतर पळून जात असताना स्व-संरक्षणार्थ गोळीबार केला, पोलिसांच्या या युक्तीवादाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
हेही वाचा -विकास दुबे एन्काऊंटर : साथीदार अरविंद त्रिवेदीला ठाण्यात अटक
ज्यावेळी अशा शंका उपस्थित केला जातात, त्यावेळी माझ्या मनात दोन प्रश्न उद्भवतात. न्यायालयीन व्यवस्थेने उशीर केल्याने पोलिसांनी गुन्हेगाराचा खात्मा झटपट केल्यामुळे लोकांना आनंद होणे, हे कशाचे द्योतक आहे? ज्यावेळी एखादा गुन्हेगार एन्काऊंटरमध्ये मारला जातो, त्यावेळी ते एन्काऊंटर खरे होते की खोटे होते, की स्टेज एन्काऊंटर होते, असे प्रश्न उपस्थित होतात. असेच प्रश्न आज देशात विकास दुबेच्या एन्काऊंटरमुळे उपस्थित केले जात आहेत. माझ्या मते अशा विषयावर चर्चा होणे देखील अत्यंत वाईट गोष्ट आहे. कारण लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास ढळमळीत होत असल्याचे हे द्योतक नाही ना? असाही प्रश्न निर्माण होत आहे. असे अॅड. उज्वल निकम यांनी म्हटले.
तसेच, ज्याला 'एक्सट्रा ज्युडिशियल किलिंग' म्हणतात त्याबद्दल न्यायालयाने त्वरित चौकशी करणे गरजेचे आहे. विशिष्ट कालावधीमध्ये या चौकशीचा निर्णय येणे अपेक्षित आहे. न्यायव्यवस्थेने अंतर्मुख व्हायला हवे. न्यायालयाने दिलेला निर्णय आणि न्यायालयामार्फत गुन्हेगाराला शिक्षा होणे, हे आपली लोकशाही बळकट करणारे असते. म्हणूनच विकास दुबे याच्या एन्काऊंटरसारख्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी लवकरात लवकर व्हायला हवी, कारण 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' हे लवकर समोर येईल, असेही मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -विकास दुबे प्रकरण: पोलिसांची लुटलेली शस्त्रे परत करा, बिकारूवासियांना पोलिसांचा इशारा