जळगाव -जिल्ह्यातील गिरणा, तापी, वाघूर, नद्यांच्या पात्रातून अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे. यासंदर्भात नदीकाठांवरील गावांच्या ग्रामस्थांकडून सातत्याने होणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या महसूल आणि पोलीस यंत्रणेला आज (सोमवारी) अखेर कारवाईसाठी पाऊल उचलावे लागले. जळगाव तालुक्यातील मोहाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात होऊन चालक जागीच ठार झाला. या घटनेमुळे अवैध वाळू उपसा तसेच वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आल्याने दोन्ही यंत्रणांनी हालचाली सुरू केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जळगाव तालुक्यात दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत 12 ट्रॅक्टर आणि 9 दुचाकी पकडण्यात आल्या.
मोहाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखालील 3 पथकांनी जळगाव तालुक्यातील मोहाडी, धानोरा आणि सावखेडा शिवारात गिरणा नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. तर दुसरीकडे तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मोहाडी, नागझिरी शिवारातील गिरणा नदीपात्रात कारवाई केली. या कारवाईमुळे वाळूमाफियांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -'संजय राऊतांची चाणक्याच्या नखाशी तरी बरोबरी होईल का?'
कारवाईपूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मोबाईल घेतले काढून -
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी धडक कारवाईच्या सूचना केल्या. ही कारवाई परिणामकारक होण्यासाठी गुप्तता पाळण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रभारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना बोलावून घेत त्यांचे मोबाईल फोन काढून घेतले. त्यामुळे कारवाईची माहिती लीक झाली नाही. गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांची नाकेबंदी करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. ही पथके वेगवेगळ्या दिशेने नदीपात्रात उतरली. मात्र, तरीही 4 ते 5 माफियांनी चोरट्या मार्गांनी वाहने पळवून नेली.