जळगाव -महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दुपारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्यसेवेत उल्लेखनीय काम करणाऱ्या योद्ध्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात हा मेळावा पार पडला. यावेळी कास्ट्राईब दिनदर्शिकेचेदेखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सन्मानाने भारावले कोरोना योद्धे -
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आरोग्य सेवा बजावली. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी राज्य शासनाच्या प्रयत्नांना साथ दिली. त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण करणे शक्य झाले. अशा कोरोना योद्धांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात 60 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.