जळगाव -तामिळनाडूतून मालकाचे 50 लाख रुपये चोरून राजस्थानमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. मंगलराम आसुराम बिष्णोई (वय 19, रा. खडाली, ता. गुडामालाणी, जि. बाडमेर, राजस्थान) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही चोरट्यांकडून 38 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये सापळा रचून ही कारवाई केली आहे.
तामिळनाडूत मालकाचे 50 लाख लांबवले, पण राजस्थानात पळून जाताना पोलिसांनी रेल्वेतच पकडले - जळगाव पोलीस बातमी
तामिळनाडूत मालकाचे 50 लाख लांबवले. मात्र, राजस्थानात पळून जाताना पोलिसांनी रेल्वेतच पकड्याची घटना समोर आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
संशयित आरोपी मंगलराम बिष्णोई हा तामिळनाडू राज्यातील देवनयागम, सेलम येथील मोहनकुमार जगाथागी यांच्याकडे घरकामाला होता. त्याने 20 मे रोजी आपल्या अल्पवयीन साथीदारासह मोहनकुमार यांच्या घरातून 50 लाख रुपयांची रोकड चोरली. त्यानंतर दोघे चोरटे राजस्थानात पळून जात होते. याप्रकरणी मोहनकुमार यांनी सेलम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तामिळनाडू आणि जळगाव पोलिसांची व्यूहरचना-
दोन्ही आरोपी हे राजस्थानातील रहिवासी असल्यामुळे ते चोरी करून तिकडे पळून जातील, असा तामिळनाडू पोलिसांना अंदाज होता. म्हणून सेलमच्या पोलीस अधीक्षकांनी तत्काळ जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. 20 मे रोजी निघालेल्या चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेसने चोरटे गेले असावेत, असा अंदाज बांधून सापळा लावण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मलकापूर ते जळगाव दरम्यान नवजीवन एक्स्प्रेसची तपासणी केली. त्यात संशयित आरोपी मंगलराम बिष्णोई आणि त्याचा अल्पवयीन साथीदार पोलिसांच्या हाती लागले. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 37 लाख 97 हजार 780 रुपये हस्तगत करण्यात आले.
आरोपींना तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात देणार -
अटक केलेल्या दोन्ही आरोपींना तामिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.