जळगाव - शेतात कापूस वेचण्याचे काम करुन भादली गावाकडे 15 महिलांना घेवून परतणारा ट्रॅक्टर जळगाव भादली फाट्यावर जलसंपदा विभागाच्या पाटचारीत ट्रॅक्टर उलटल्याची घटना सोमवारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टरमधील हिरकणी हिरामण सोनवणे (वय - 42, रा - भादली) या जागीच ठार झाल्या असून ट्रॅक्टरमधील 12 महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पाटचारीत -
भादली शिवारात पितांबर रामकृष्ण ढाके यांचे शेतात कापूस वेचणीचे काम सुरु आहे. या कामासाठी भादली येथील महिलांना घेण्यासाठी तसेच कापूस वेचणीनंतर पुन्हा सोडण्यासाठी सुरेश तुळशीराम कोळी यांचा ट्रॅक्टर (एम.एच 19 डी जी 8266) लावण्यात आली होता. सोमवारी सकाळी ट्रॅक्टर ट्रॉलीसह महिलांना शेतात कापूस वेचणीसाठी घेवून गेले होते. कापूस वेचणी झाल्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर महिलांना सोडण्यासाठी भादली गावाकडे परतत होता. याचवेळी तीनच्या सुमारास जळगाव भादली फाट्यावर पाटचारीवरुन जवळून जात असतांना अचानकपणे चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व पाटचारीवर ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटला. यात ट्रॅक्टरमधील हिरकणी हिरामण सोनवणे (वय 42) ही महिला डोक्याला गंभीर दुखापत होवून जागीच ठार झाली.