जळगाव -राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. या दौऱ्यात विविध प्रश्नांबाबत त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंत्र्यांची भेट घेऊ देण्यास नकार दिला. मात्र, कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम असल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केली. मंत्री उदय सामंत देखील विद्यार्थ्यांना न भेटताच निघून गेले. धुळ्यानंतर जळगावातही अभाविपच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला असून, या गोष्टीचा अभाविपच्या आंदोलकांनी निषेध नोंदवला.
अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंत्र्यांची भेट घेऊ देण्यास नकार दिला मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजता विद्यापीठात कुलगुरुंसोबत ऑनलाइन परीक्षेसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते थेट विद्यापीठातून जात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करून सर्व कार्यकर्त्यांनाबाजूला केले. हा प्रकार सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला आहे.
अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक उडाली. विद्यार्थी कार्यकर्ते आपला आक्रमक पवित्रा मागे घेत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना थेट धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्यामुळे वातावरण अधिकच बिघडले. मंत्री उदय सामंत यांचा ताफा विद्यापीठातून रवाना झाल्यानंतर पोलिसांनी अधिकच आक्रमक होत आंदोलकांना त्या ठिकाणाहून पिटाळून लावायला सुरुवात केली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी पोलिसांवर चुकीची वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.
'विविध प्रलंबितप्रश्नांबाबत आम्ही उच्चशिक्षण मंत्र्यांची भेट घेणार होतो. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे रीतसर परवानगी देखील घेतली होती. परंतु, मंत्री उदय सामंत आम्हाला न भेटताच निघून गेले. आम्ही आमच्या मागण्या कायदेशीर मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचणार होतो. परंतु, पोलिसांनी आम्हाला चुकीची वागणूक दिली,' असा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
'पोलिसांनी आम्हाला गुंडांप्रमाणे वागणूक दिली. आम्ही विद्यार्थी होतो. आमचे प्रश्न शांततेच्या मार्गाने मांडत होतो. परंतु आम्हाला चुकीची वागणूक मिळाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी वेळ नसेल तर, त्यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणीही अभाविपच्या वतीने करण्यात आली आहे.