जळगाव -कोरोना काळात थकलेली मालमत्ताकराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने जळगाव महापालिकेने 'अभय' योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार 7 जानेवारीपासून ते फेब्रुवारी अखेरपर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास शास्ती अर्थात दंडाच्या रक्कमेवर तीन टप्प्यांत 75 टक्क्यांपासून ते 25 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती मंगळवारी (दि. 5 जाने.) आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.
आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अभय योजनेची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी आयुक्त कुलकर्णी होते.
थकबाकीचा भरणा होत नाही, तोपर्यंत दंड लावणार
ते म्हणाले, आतापर्यंत मालमत्ता कराच्या थकबाकीवर एका वर्षापर्यंत दरमहा 2 टक्के दंड लावण्यात येणार होता. तो दंड आता जोपर्यंत थकबाकीचा भरणा होत नाही, तोपर्यंत लावला जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
थकबाकीदारांना दंडात सूट
कोरोनाच्या काळात यंदा मालमत्ता कराची बिले विलंबाने वाटप करण्यात आली. त्यामुळे मालमत्ता कराची वसुली देखील प्रभावीपणे झाली नाही. तसेच कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. या दृष्टीने महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली व्हावी तसेच थकाबाकीदारांना दिलासा मिळावा, या उद्देशाने महापालिका पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन अभय योजना आणल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिका अधिनियमातील मालमत्ता कराच्या एका कलमानुसार थकबाकीवर लावण्यात आलेल्या दंडात सवलत देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार जळगाव शहरातील मालमत्ताकराच्या थकबाकीदारांना दंडात सूट देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.