जळगाव- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जळगाव शहरातील केसीई सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने यंदा देखील जिल्ह्यात आपले वर्चस्व राखले. या महाविद्यालयाचा निकाल ९७.२४ टक्के लागला असून, वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आयुष दिनेश येवले हा ९६.६१ टक्के गुण मिळवून जळगावातून प्रथम आला आहे. तर वैष्णवी राहुल तोतले ९५.६९ टक्के मिळवून द्वितीय आणि निकिता सोपान पाटील ९५.५३ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी ऑनलाईन जाहीर होणार असल्याचे कळताच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसोबत पालकवर्गाची देखील धाकधूक वाढली होती. दुपारी एक वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनी घरीच मोबाईल, लॅपटॉपवर ऑनलाईन निकाल पाहिला. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरीच कुटुंबीयांसोबत आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी घरीच राहून निकाल ऑनलाईन पाहिला. शाळा आणि महाविद्यालयात जाणे विद्यार्थ्यांनी टाळले.