जळगाव- 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले मराठी अभिनेते तथा मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर हे बुधवारी शिवसेनेच्यावतीने आयोजित 'माऊली संवाद' कार्यक्रमासाठी जळगावात आले होते.
शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलावर्गाने या कार्यक्रमात त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करत महिलांची सुरक्षा, रोजगार, आरोग्य, शिक्षण अशा विषयांवर आपल्या अडीअडचणी मांडल्या. शिवसेनेच्यावतीने याप्रश्नी शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन बांदेकर यांनी यावेळी दिले.
आम्ही बचतगट चालवतो, आम्हाला बाजारपेठ हवी -
या कार्यक्रमादरम्यान आदेश बांदेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्यावतीने राज्यभरातील महिलांचे प्रश्न, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी 'माऊली संवाद यात्रे'चे आयोजन केले आहे. तुम्ही आपल्या समस्या निर्भीडपणे मांडा, असे आवाहन बांदेकर यांनी केले. यावेळी बहुसंख्य महिलांनी रोजगाराचा मुद्दा मांडला. आम्ही बचतगट चालवतो. मात्र, हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने आम्हाला अडचणी येतात. त्यामुळे बाजारपेठ मिळाली तर आम्ही स्वावलंबी होऊ शकतो. आम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिलांनी केली.