जळगाव -बदलत्या निसर्गचक्रामुळे शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. अशा परिस्थितीत तग धरायचा असेल तर प्रयोगशील शेतीशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर उरलेला नाही. हीच बाब जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील फाफोरे येथील युवा शेतकरी किरण रवींद्र पाटील यांनी ओळखली. त्यांनी यावर्षी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन भाजीपालावर्गीय कारल्याची शेती यशस्वी केली आहे. त्यांच्या शेतातून दर आठवड्याला सुमारे 4 ते 5 क्विंटल कारले निघत आहे. कारल्याच्या विक्रीतून त्यांना हजारो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. कारल्याची शेती करत त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
माहिती देताना युवा शेतकरी किरण रवींद्र पाटील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका हा तसा अवर्षणप्रवण भाग. पाऊस वगळता या तालुक्यात शेतीच्या सिंचनाचा दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतात कापूस, ज्वारी, बाजरी, मका अशा पारंपरिक हंगामी पिकांची लागवड करतात. मागील 2 वर्षांचा काळ सोडला तर अमळनेर तालुक्यातील सलग 6 ते 7 वर्षे सतत दुष्काळ पडला होता. त्यामुळे आपल्या शेतीत काहीतरी प्रयोग करायचा, या विचारातून किरण पाटील यांनी भाजीपाल्याची शेती करायचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाला वडील रवींद्र पाटील यांनीही साथ दिली. अशातच किरण यांनी भाजीपाला शेतीच्या दिशेने पाऊल टाकले. पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
- 2 एकरात केली कारल्याची लागवड-
किरण पाटील यांनी आपल्या शेतात 2 एकर क्षेत्रात कारल्याचे देशी वाण आणून त्याची लागवड केली आहे. साधारणपणे दीड महिन्यांपूर्वी त्यांनी सव्वाफुट अंतराने कारल्याची लागवड केली. विहिरीला पाणी कमी असल्याने ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची उपलब्धता केली. कारल्याचे वेल नीट वाढावेत म्हणून शेतात तार व बांबूची रोपणी केली. कारल्याचे देशी बियाणे, खते, ठिबक सिंचन संच, तार व बांबू तसेच मजुरी मिळून त्यांना सुमारे 90 हजार रुपये खर्च आला. त्यानंतर 2 आठवड्यांपूर्वी शेतातून कारले निघायला सुरुवात झाली.
- पहिलाच दर मिळाला 45 रुपये प्रतिकिलो-
किरण पाटील यांच्या शेतातून कारल्याची पहिली तोडणी सुमारे 5 ते 6 क्विंटलची झाली. हा माल त्यांनी स्थानिक बाजारपेठेत विकला. त्यांना पहिलाच दर 45 रुपये प्रतिकिलो इतका मिळाला. आतापर्यंत 4 वेळा तोडणी झाली असून, त्यांना प्रत्येकवेळी प्रतिकिलोला 30 ते 45 रुपयांपर्यंतच दर मिळाला आहे. कारल्याची विक्री ते स्थानिक बाजारपेठेतच करत असल्याने वाहतूक खर्चही कमी लागत आहे. कारल्याचा दर्जा उत्तम असल्याने व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पावसामुळे कारल्याचे वेल बहरले असून, माल जास्त प्रमाणात निघत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेसह सुरत, वाशी, मुंबई येथील बाजारपेठेत कारल्याची विक्री करणार असल्याचे किरण पाटील यांनी सांगितले.
- खर्चवजा जाता 3 ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित-
कारले पिकाचा कालावधी हा साधारणपणे 4 महिन्यांचा मानला जातो. या काळात 100 ते 125 क्विंटल कारल्याचे उत्पादन होऊ शकते. त्यामुळे किरण पाटील यांना कारल्याच्या शेतीतून खर्चवजा जाता 3 ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. दर आठवड्याला कारल्याची विक्री करून किरण पाटील यांच्या हातात रोख पैसा येत आहे. त्यामुळे कारल्यासोबत गिलके आणि काकडी लागवड करण्याचा त्यांचा विचार आहे.
- भाजीपाला शेती ठरू शकते योग्य पर्याय-
कारल्याची शेती यशस्वी करणारे किरण पाटील हे इतर शेतकऱ्यांना सल्ला देताना म्हणाले की, पारंपारिक पीक पद्धतीऐवजी आता शेतकऱ्यांनी दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. मीदेखील माझ्या शेतीत यापूर्वी कापूस, मका, ज्वारी यासारख्या पिकांची लागवड करत होतो. परंतु, मला तीन ते चार महिने मेहनत घेऊन देखील शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. शेती तोट्याची झाली होती. त्यामुळे मी भाजीपाला शेतीचा पर्याय निवडला. या शेतीत मला कापूस लागवड केल्यानंतर खर्चवजा जाता फक्त 20 ते 25 हजार रुपये मिळत होते. मात्र, कापूसऐवजी कारल्याची लागवड केल्यामुळे मला खर्चवजा जाता तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे, असे ते म्हणाले.