जळगाव - भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या चारचाकीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. गिरीश महाजन हे मुंबईहुन आपल्या चारचाकीने जामनेरला परत येत असताना पाचोरा तालुक्यातील वरखेडी गावाजवळ रविवारी दुपारी हा अपघात घडला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महाजन यांची कार हळुवार चालत होती. याचवेळी मद्यधुंद अवस्थेत असलेला दुचाकीस्वार महाजन यांच्या गाडीवर मागून धडकला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. बी. सी. पवार असे या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
गिरीश महाजन हे रविवारी सकाळी मुंबईहुन जामनेरला चारचाकीने परत येत होते. पाचोरा ते वरखेडी गावादरम्यान रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने महाजन यांचा कारचालक हळू वेगाने कार चालवत होता. दरम्यान, महाजन यांच्या कारमागून बी.सी. पवार हा दुचाकीवरून वेगाने येत होता. मद्यधुंद असल्याने तो थेट गिरीश महाजन यांच्या कारवर मागून आदळला. त्यात पवार याला दुखापत झाली. या अपघातानंतर गिरीश महाजन यांनी कार थांबवून जखमी पवार याला स्वतःच्या वाहनातून तातडीने पाचोरा येथे उपचारासाठी हलवले. यावेळी रस्त्यावरील इतर वाहन चालकांनी मदतकार्य केले. पवार हा वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.