जळगाव -शहरात वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आणि वाढत जाणारा मृत्यूदर पाहता आगामी पाच दिवसात शहरातील ५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. मनपाकडून २५० कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून ही मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यासह शहरातील हॉटस्पॉट ठरवून त्या भागांमध्ये विशेष नियोजन करण्याचाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
जळगाव शहरातील ५ लाख नागरिकांचे होणार सर्व्हेक्षण; पालकमंत्र्यांचे मनपा प्रशासनाला आदेश - survey of Jalgaon city
जळगाव शहरात कोरोना रुग्णांची वाढत जाणारी संख्येच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा विश्रामगृहात बैठक घेण्यात आली.
शहरात कोरोना रुग्णांची वाढत जाणारी संख्येच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, माजी महापौर नितीन लढ्ढा, अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, उपायुक्त संतोष वाहुळे, मिनीनाथ दंडवते, मनपा मुख्य लेखाधिकारी कपिल पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
मनपा उपायुक्तांनी शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देताना, सद्यस्थितीतील रुग्ण व क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी कोणतीही अडचण नसून, भविष्यात जरी रुग्णसंख्या वाढली तरी बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र, मनपा वैद्यकीय विभागाच्या पथकात मनुष्यबळाची कमतरता असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जि. प. मुख्यधिकाऱ्यांशी चर्चा करून, प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मनपा क्षेत्रात काम करण्याचा सूचना दिल्या. नितीन लढ्ढा व डॉ. अश्विन सोनवणे यांनी शहरातील काही खासगी रुग्णालये ताब्यात घेवून त्याठिकाणी रुग्ण व क्वारंटाईन केलेल्यांची व्यवस्था करण्याची मागणी केली. याबाबत गरज पडल्यास निर्णय घेण्याची तयारी पालकमंत्र्यांनी दर्शविली. कोवीड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या रुग्णांच्या आहारात अंडी व केळी देण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. शहरात जे काही मृत्यू होत आहेत, त्यात अनेकदा कोरोना संशयित रुग्ण असतो. मात्र, त्यांचा अहवाल न मिळाल्याने अनेक ठिकाणी विधीवत अंत्यसंस्कार केले जात असतात. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची तक्रार महापौरांनी केली. त्यामुळे स्वॅब घेतलेल्यांचे अहवाल लवकर मिळण्याबाबत सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करा -
शहरात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी इतर मृतदेहांचे अंत्यसंस्कार करायला नागरिक येतात. त्यामुळे कोवीड रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करण्याची सूचना आमदार सुरेश भोळे यांनी मांडली. यासाठी मेहरुणच्या स्मशानभूमीचा प्रस्ताव आमदारांनी दिला. याबाबतचा निर्णय मनपा प्रशासनाने घेण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. क्वारंटाईन कक्षातील संशयितांच्या मनोरंजनासाठी कक्षात एफएमची व्यवस्था करण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. शहर वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. यासह शहरातील रुग्णांच्या संख्येवर हॉटस्पॉट निवडून त्यात विशेष काम करण्याचा सूचना दिल्या.
७ हॉटस्पॉटमध्ये विशेष लक्ष देणार -
शहरात कोरोना रुग्णांची संख्या सर्वच प्रभागात वाढत असली तरी ७ भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशा भागांमध्ये विशेष लक्ष घालून या भागातून इतर भागांमध्ये संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घेण्याचा सूचना मनपा प्रशासनाला पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच गरज पडल्यास पोलीस प्रशासनाचीही मदत घेण्याचा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
हॉटस्पॉट आणि तेथील रुग्णसंख्या अशी-
१. सालार नगर - १०
२. जोशीपेठ - ८
३. अक्सानगर - ६
४.शाहूनगर - ११
५.गांधीनगर - ९
६. वाघनगर - १४
७.सम्राट कॉलनी - ५