जळगाव- कोरोनामुळे उद्भवलेली युद्धजन्य परिस्थिती आपल्या सर्वांच्या संयमाची परीक्षा घेणारी आहे. या कठीण काळात आपण सर्व जण सुरक्षित रहावेत, म्हणून पोलीस, डॉक्टर्स, नर्स हे योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्यावर आहेत. जळगावात अशीच एक महिला पोलीस कर्मचारी आहे; जी सहा महिन्यांची गर्भवती असताना आपल्या चिमुकल्याला घरी ठेऊन युद्धजन्य काळातही कर्तव्यावर आहे. पोटाच्या गोळ्यापासून दूर राहत असताना तिच्यातील आईपणाच्या भावनेला मुरड घातली जात आहे. मात्र, आपल्या भावना बाजूला ठेऊन तिने देशसेवेला प्राधान्य दिले आहे.
ज्योती सुरेश साळुंखे-सोनवणे, असे या आईचे नाव आहे. ज्योती साळुंखे या जळगाव जिल्हा पोलीस दलात महिला पोलीस नाईक म्हणून सेवारत आहेत. सध्या त्या जळगाव शहर वाहतूक शाखेत नियुक्तीला आहेत. शहरातील दादावाडी परिसरात त्या कुटुंबीयांसोबत वास्तव्याला आहेत. पती, पाच वर्षांचा मुलगा लक्षदीप, सासू-सासरे असा त्यांचा परिवार आहे. एक आई, पत्नी तसेच सून म्हणून कौटुंबीक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असताना, पोलीस दलात एक महिला पोलीस नाईक कर्मचारी म्हणून देखील त्या आपली जबाबदारी चोखपणे सांभाळत आहेत. 'घर' आणि 'पोलीस दलातील नोकरी' अशा दोन्ही आघाड्यांवर आपलं आईपण जपत त्यांचा लढा सुरू आहे.
यावल तालुक्यातील दहिगाव हे ज्योती यांचे माहेर, 2014 मध्ये जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील योगेश अशोक सोनवणे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. तत्पूर्वी नोव्हेंबर 2007 मध्ये त्या जळगाव पोलीस दलात भरती झाल्या होत्या. सुरुवातीला जामनेर येथे काही वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांची जळगावात बदली झाली. त्यानंतर पोलीस मुख्यालय व आता त्या जळगाव शहर वाहतूक शाखेत पोलीस नाईक म्हणून नियुक्तीला आहेत.
पोटच्या गोळ्याला दूर ठेवत, 6 महिन्यांची गर्भवती आई युद्धजन्य काळातही कर्तव्यावर! 2017 पासून त्यांचे कुटुंब जळगावात स्थायिक झाले. त्यांचे सासरे अशोक किसन सोनवणे यांनी देखील जळगाव पोलीस दलात सेवा बजावली आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या सासऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत ज्योती देखील पोलीस दलात सेवा बजावत आहेत. घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना त्यांना पती योगेश, सासूबाई शारदा आणि सासरे अशोक सोनवणे यांचे पाठबळ लाभत आहे.
असा असतो ज्योती यांचा दिनक्रम-
दररोज सकाळी लवकर उठून आधी स्वतःची कामे उरकणे. त्यानंतर घरच्या लोकांची कामे करणे, त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध करून देणे, स्वयंपाक केल्यानंतर धुणं-भांडी उरकणे, मुलगा लक्षदीप याचे आवरणे, त्याचे आणि घरातील लोकांचे जेवण, नंतर स्वतः जेवण करणे. घरातील जबाबदारी आटोपल्यावर ड्युटीवर निघणे. दिवसभर ड्युटी सांभाळून पुन्हा घरी परत आल्यावर एक पत्नी, आई आणि सुनबाई म्हणून सर्व कौटुंबीक जबाबदारी सांभाळणे, असा त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. ही जबाबदारी सांभाळताना ना कोणती तक्रार, ना कोणता राग अशा रितीने त्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जात आहेत.
आई म्हणून लक्षदीपसाठी तुटतो जीव-
मी महिला पोलीस कर्मचारी आहेच. परंतु, सर्वात आधी मी एक पत्नी, आई देखील आहे. हे मान्य आहेच; पण पोलीस दलात काम करताना जबाबदारीला प्राधान्य द्यावे लागते. देशसेवेचे हाती घेतलेले व्रत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावेच लागेल म्हणून भावना बाजूला ठेवाव्या लागतात. एक आई म्हणून लक्षदीपसाठी माझा जीव निश्चितच तुटतो. पण काळजावर दगड ठेऊन कर्तव्य पार पाडावे लागत आहे. घर आणि पोलीस दलातील नोकरी अशा दोन्ही जबाबदारी सांभाळताना खूप तारेवरची कसरत करावी लागते. पण त्याशिवाय दुसरा पर्याय देखील नाहीये. लक्षदीपकडे दुर्लक्ष होते. पण पती योगेश, सासू आणि सासरे हे त्याला सांभाळतात. मी घरी असल्यावर लक्षदीपला आणि सर्वांना शक्य तेवढा जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करते.
आज मी सहा महिन्यांची गर्भवती आहे. अशा परिस्थितीत ड्युटी सांभाळणे धोक्याचे आहे, म्हणून मी सुटी घ्यावी, असा माझ्या घरच्या लोकांचा आग्रह आहेच. मात्र, आज आपल्यावर कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचे सावट आहे. अशा परिस्थितीत आम्हीच माघार घेतली तर देशाचे काय होईल? हा प्रश्न स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. मला जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी पोलीस म्हणून माझी जबाबदारी पार पाडणारच आहे. नोकरीची जबाबदारी सांभाळत असताना वरिष्ठांसोबतच सहकारी कर्मचारी देखील वेळोवेळी मदत करतात. त्यामुळेच मला सर्व काही शक्य होते, असे ज्योती साळुंखे यांनी 'ई- टिव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
सूनबाईचा आम्हाला अभिमान वाटतो -
आमची सुनबाई घर आणि नोकरी सांभाळताना आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे. घराची सर्व कामे पूर्ण करून ती नोकरी करतेय. हे करत असताना तिची खूप धांदल उडते. पण कधीही चिडचिड नाही की राग-आदळआपट नाही. आता तर ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. अशा परिस्थितीत तिने सुटी घेऊन घरी थांबावं असा आमचा आग्रह आहे. कारण कोरोनासारख्या भयंकर आजाराची साथ सुरू आहे. अशा परिस्थितीत तिच्या जीवाची चिंता वाटते. पण पोलीस म्हणून आपलं कर्तव्य ती महत्वाचे मानते. एवढ्या कठीण परिस्थितीतही ती ड्युटी करतेय, याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे ज्योती यांचे सासू-सासरे म्हणाले.