जळगाव -दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी जळगाव शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत शालेय विद्यार्थी, समाजबांधवांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
समस्त लाडवंजारी समाज तसेच श्रीराम मंदिर संस्थानातर्फे ही शोभायात्रा काढण्यात आली. यासोबतच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सर्वप्रथम शिवतीर्थ मैदानावर गोपीनाथ मुंडे यांच्या भव्य प्रतिमेला महापालिका आयुक्त उदय टेकाळे, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी सहभाग नोंदवत लेझीम नृत्य केले. समाजबांधवानी ढोल व ताशांच्या गजरात जल्लोष करीत गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष केला. महिला पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.